मनोगत

नमस्कार मंडळी ,
अभिजात मराठा वास्तुशैलीचा वारसा जपत वाडा संस्कृतीची नव्याने ओळख करुन देणाऱ्या ‘ढेपे’ वाड्यात मी नितीन ढेपे आपले सहर्ष स्वागत करतो. ही वास्तू बांधण्याच्या संकल्पनेबाबत आणि ह्या वास्तू बाबत मी आपणास थोडी माहीती सांगणार आहे.
‘ढेपे वाडा’ ही वास्तू आपल्या पैकी अनेकांनी अनुभवलेल्या वाडा संस्कृतीचे आणि काळाच्या ओघात पडद्याआड गेलेल्या मराठा वास्तुशैलीचे प्रतिक आहे. “ढेपे वाडा” बांधण्यामागे आपली समृद्ध अशी मराठा वास्तुशैली आणि जुनी वाडा संस्कृती पुनरुज्जीवीत करणे हा उद्देश आहे. मराठा वास्तुशैलीवर आधारीत वाड्याची नवीन वास्तू जवळपास २०० वर्षानंतर प्रथमच ‘ढेपे वाड्याच्या’ रुपाने उभी राहीली आहे.
मराठा वास्तुशैली ला जवळजवळ ३५० वर्षाचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी इ.स. १६४१ साली स्वराज्याची धुरा सांभाळल्यावर मुघलांनी उध्वस्त केलेल्या इमारतींची पुनःबांधणी सुरु केली त्यांच्या द्रष्ट्या मार्गदर्शनाखाली मराठा वास्तुशैली अस्तित्वात आली शिवरायांनंतर संभाजी महाराज, शाहू महाराज आणि पेशवाई पर्यंतच्या काळात मराठा वास्तुशैलीमध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत गेल्या. सासवाडचा पुरंदरे वाडा, साताय्राचा कदम वाडा, मेणवलीचा फडणवीस वाडा, बारामतीचा काळे वाडा, आणि बाबुजी नाईक यांचा वाडा, पुण्याचा रास्तेवाडा, विश्रामबागवाडा, शनिवारवाडा आणि तत्कालीन सरदार, पाटिल, देशमुखांनी बांधलेले काही वाडे मराठा वास्तुशैली नुसारच बांधलेले आहेत ! मराठा वास्तुशैली वर प्रामुख्याने मुघल, राजस्थानी, गुजराथी तसेच दाक्षिणात्य वास्तुशैलीचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच संपुर्ण भारतात वाड्याशी साधर्म्य असलेल्या वास्तू दिसून येतात उत्तरेकडे त्यांना हवेली म्हणतात, तर दक्षिणेकडे त्याला विड किंवा तरवाड म्हणतात.
स्वातंत्र्यपुर्व काळात सर्वसामान्य नागरीकांनी उपलब्ध जागेनुसार वेगवेगळ्या आकारमानाचे अनेक वाडे संपूर्ण महाराष्ट्रात बांधले. त्या काळी बांधकामाची पद्धतच अशी होती की, प्रत्येक वाडा किमान शंभर दिडशे वर्षे सहज टिकायचा ! त्या वाड्यांमध्ये अनेक कुटूंबांच्या अनेक पिढ्यांनी वास्तव्य केले. वाड्यांचे मालक तसेच भाडेकरुंच्या घरातील बारशांपासून ते सहस्त्रचंद्रदर्शनापर्यंतची सर्व मंगल कार्ये वाड्याच्या वास्तुच्या साक्षीतच पार पडायची. वाड्यातल्या बाळगोपाळांची किलबील, त्यांनी गिरविलेले बाराखडीचे कित्ते, तिन्हीसांजेला सर्वांनी एकत्र येऊन म्हणलेला परवचा त्या वास्तूला नवचैतन्य प्राप्त करुन द्यायच्या.
एवढेच काय वाड्यातल्या लेकीसुनांना हळदीकुंकू, भोंडले, वाळवणं करु देण्यात मोलाचा वाटा त्या वास्तुचा असे. सुख दुखाःच्या प्रसंगी एकमेकांमधले हेवेदावे विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची प्रवृत्ती केवळ वाड्यात दिसून यायची. अर्थात ह्याला कारणीभूत वाड्यांची वास्तुरचनाच असायची वाड्यांमध्ये घराच्या आतील जागा कमी आणि चौक, परस, विहीर इत्यादी सार्वजनिक जागा जास्त असायची त्यामुळे त्यात वास्तव्य करणाय्रांचा संवाद जास्त व्हायचा. वाड्यांमधल्या रहाणीमानातून आणि वास्तव्यातुन वाडा संस्कृती जन्माला आली आणि बहरली. काळ बदलला, जगण्याचे संदर्भ देखील बदलू लागले. एकछत्री अंमलाखालील एकत्र कुटुंब पद्धती विखरु लागली. कुटुंब कलहात भरडल्या गेलेल्या प्रत्येकाला विभक्त व्हायची स्वप्न पडायला लागली तसेच वाढत्या महागाईमुळे वाड्यांची निगा राखणे कसरतीचे होऊ लागले. आर्थिक बाबींना महत्व प्राप्त झाल्यामुळे वाड्याच्या वास्तुत नांदणारे खेळीमेळीचे वातावरण संपुष्टात येऊन कोर्टकचेय्रा, ताणतणावांची त्यात भर पडू लागली. त्याच वेळी वाड्याच्या वास्तुरचनेच्या अगदी विरुद्ध रचना असलेल्या सेल्फ कंटेंड फ्लॅट संस्कृतीने वाडामालक व भाडेकरुंच्या मनावर गारुड करायला सुरुवात केली आणि मग काय शहरांचे रुप झपाट्याने बदलू लागले ! मी ही पेशाने बांधकाम व्यवसायिक असल्याने पुण्याच्या पेठांमधील वाड्यांशी जोडला गेलो. व्यवसायिक अपरीहार्यतेमुळे मी आजवर अनेक वाडे पाडून विकसीत केले परंतू प्रत्येक वाड्यातील मालक आणि भाडॆकरुंच्या खोल्यांचा ताबा घेताना त्यांचे थरथरणारे हात व डोळ्यांमधील भाव मला हेलावून सोडत. कित्येक वेळा त्यांचे बरोबर मीही भावना आवरु शकत नसे.
वाडा पाडण्यासाठी रिकामा झाल्यावर, वाड्याच्या त्या मोकळ्या वास्तूत मला प्रचंड अपराधी वाटायचं ! आपण एका जिंदादील वास्तुचा इतिहास पुसतोय अशी खंत वाटायची आपल्या नव्या पिढीला आपली पारंपारिक वास्तुशैली दाखवण्याऎवजी आपण ती उध्वस्त करतोय याची सल मनात असायची ! वाड्यांच्या वास्तुंनी जीर्ण् होईपर्यंत अनेक कुटूंबाच्या अनेक पिढ्या वाढवल्या मात्र वाडे पाडून बांधलेल्या नवीन इमारतींमध्ये ह्या इतिहासाची पुनरावृत्ती होणे शक्य नाही या कल्पनेने दुखः व्हायचे. वाड्यांबाबत माझ्या मनात असलेल्या भावनांमध्ये मी इतका गुंतत गेलो की मला इमारती बांधण्याऎवजी वाडाच बांधायची स्वप्न पडू लागली आणि हळूहळू त्याचे रुपांतर दृढ निश्चयात झाले. पाश्चात संस्कृती आणि वास्तुशैलीचा प्रभाव असलेल्या फ्लॅट मध्ये नांदणाय्रा नव्या पिढीसाठी संस्कार, प्रेम व आनंद देणारी वाडा संस्कृती पुन्हा जिवंत करण्याचे मी ठरवले. मला एक असा वाडा बांधायचा होता जो २०० वर्षापूर्वी लयाला गेलेल्या मराठा वास्तुशैलीची तसेच सध्या लयाला जात चाललेल्या वाडा संस्कृतीची पुन:ओळख करुन द्यायला तसेच त्याचा प्रसार करायला लोकांना भाग पाडॆल ! मला एक असा वाडा बांधायचा होता की पुर्वी वाड्यांमध्ये वास्तव्य केलेल्या एकत्र कुटूंबातील सदस्यांना पुन्हा एकदा सहजिवनाचा आनंद घेता येईल. मला असा एक वाडा बांधायचा होता की तिथे आल्यावर आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीचा परिस स्पर्श केवळ आजच्या पिढीला नव्हे तर या पुढील अनेक पिढ्यांना तिथे वास्तव्य करुन प्रत्यक्षपणॆ अनुभवता येईल.
मी वाडा बांधायचा निर्णय घेतल्यावर लोकांपर्यंत पोहोचवायचा एकमेव मार्ग म्हणजे पर्यटन हाच होता ! अर्थात माझी आर्थिक गुंतवणूक, वाड्याची देखभाल व पर्यटनातील मिळणारे उत्पन्न व्यस्त असेल हे मला माहीती होते पण घेतलेल्या ध्यासापुढे हे सर्व गौण होते. वाड्याचे संपूर्ण बांधकाम आपल्या निरिक्षणाखाली व्हावे हा माझा अट्टाहास होता कारण मी अनुभवलेल्या वाड्यांमधील सर्व बारकावे मला प्रत्यक्षात उतरवायचे होते आणि त्या निर्मितीतला पुरेपुर आनंद घ्यायचा होता. थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने तसेच ह्या प्रकल्पाचे वास्तुविशारद व मराठा वास्तुशैलीचे तज्ञ डॉ. अविनाश सोवनी यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आणि सर्व सहकाय्रांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक अडचणींवर मात करत मी माझे स्वप्न पूर्ण करु शकलो.
मला ह्या संकल्पने विषयीचे पेटंट देखील दि. १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वार्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. देश विदेशातील अनेक अतिथी इथल्या वास्तव्याची अनुभूती घेत असून साखरपुडा, लग्न, इत्यादी कौटूंबिक कार्यक्रम व विवीध सण देखील इथे साजरे होतात विवीध कला, संस्कृती व चांगल्या परंपरा जपण्याचे काम ही वास्तू करत असल्याने मराठी संस्कृतीचा एक अनमोल वारसा ठरली आहे ! मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की हा वारसा अनुभवताना ह्या वास्तुकडे आपलं घर ह्या नात्याने पहा आणि त्याच नात्याने संभाळा ! मला खात्री आहे इथे तुम्हाला तुमच्या आठवणीतलं आजोळ, मनातलं माहेर आणि स्वप्नातलं घर नक्कीच सापडेल.

आपला ,
श्री. नितीन ढेपे

Mahadwar of Dhepe wada
Marraige decoaration
Dinning area @ Dhepe wada
error: Content is protected !!