मराठी माती . . . .
पराक्रमी विरांच्या शौर्याची महती गाते . . . आजही
स्वाभिमानास्तव जगणे उधळते… आजही
राष्ट्रनिष्ठेचा नंदादिप मनामध्ये तेवत ठेवी . . . आजही
कला, संस्कृती आणि भाषा यांवर निस्सिम प्रेम करते… आजही
भावगीतांच्या ओव्या डोळ्यांमधील डोहात विरघळती… आजही

शिवरायांच्या पराक्रमाने रोमांचीत झालेल्या आणि थोर संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या मराठी मातीत, जन्माला आलो, इथे रुजलो नि फुललो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशा या भूमीतील समृद्ध संस्कृतीतून उदयास आली ती मराठा वास्तूशैली… आजच्या आधुनिक पिढीला सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या आणि पेशवाई पर्यंत उत्तरोत्तर समृद्ध होत गेलेल्या या वास्तुशैलीची जवळून ओळख करून देण्याचे आम्ही ठरवले. अस्सल मराठी मनाच्या कोप-यात अनमोल म्हणून जपलेले सारेकाही पुन्हा आधुनिक जगापुढे आणण्यासाठी अत्यंत अविरत प्रयत्नातून आम्ही आलिशान मराठा वास्तुशैलीचा आधुनिक आविष्कार जगापुढे घेऊन येत आहोत… ढेपे वाडा!
वाडा म्हणजे एक जिंदादिल वास्तू! आपल्यापैकी अनेकांनी वाड्यात वास्तव्य करून ह्या वास्तुचा अनुभव घेतला असेलच. अनेक कुटुंबांच्या अनेक पिढ्या एकत्रितपणे व गुण्यागोविंदाने नांदणारी ही वास्तू सध्या कालबाह्य होत चालली आहे. आपल्या वाडासंस्कृतीचा परिसस्पर्श नव्याने अनुभवता यावा आणि नव्या पिढीला देखील वाडा संस्कृतीची ओळख व्हावी. या जाणिवेतून आम्ही साकारली आहे एक अप्रतिम वास्तू…ढेपे वाडा! ही केवळ वास्तू नव्हे तर पर्यटनासाठी नवं आकर्षणकेंद्रही ठरणार आहे; म्हणून तर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने त्याची विशेष दखल घेतली आहे.

इथे यावं… रमावं.. इथलंच होऊन जावं… कारण हेच कुठंतरी आपलं मूळ आहे.. असंच आपल्याला अगदी मनापासून वाटावं यासाठी आपण मराठमोळ्या पारंपारिक पोषाखात सहकुटूंब आमच्या वाड्यात वास्तव्य करावे, ढेपेवाडा व परिवार खुल्या मनानं, खान्देशी मायेनं, व-हाडी लयीत, कोकणी शैलीत आणि पुणेरी दिमाखात आपल्या सहर्ष स्वागतासाठी सज्ज आहे.

स्वागतोत्सुक,
श्री. नितीन ढेपे, सौ. ऋचा ढेपे.